Wednesday, September 5, 2018

रामायण ते मारायण

                 छे हो..रामायणाचा अपभ्रंश वगैरे नाही काही. हो, पण रामायणाशी साधर्म्य साधणारा किंवा रामायणापासून आजपावेतो तिळमात्रही न बदललेला एक विषय आहेच.बरं, असही नाही की या विषयावर भाष्य झालेलं नाही.तरीही अति सकारात्मक भूमिका असंही म्हणू शकता की मला आपलं राहून राहून वाटतं की एक परिस्थिती आहे जी कधीतरी नक्की बदलेल म्हणून हा लेख.
                  रामायण ते मारायण अशासाठी संबोधलं की स्त्री ही एक व्यक्ती, एक स्वतंत्र भावना न समजता ती केवळ एक उपभोग्य वस्तू हीच मानसिकता आजही कायम आहेच. उपहासाची बाब म्हणजे, रामायण असो वा महाभारत ते एका स्त्रीमुळेच घडलं असं थट्टेत म्हणतो आपण. पण तितक्याच सहजतेने कित्येक जण 'बाई आणि बाटलीची' सोय गृहीत धरून त्यावर त्यांच्या कार्याची इतिकर्तव्यता ठरत असते. यातील नीतीमत्ता किंवा नैतिकता हा माझा विषय या लेखापुरता तरी नाही. प्रश्न आहे तो बाई नावाच्या व्यक्तीचं व्यक्तित्व झुगारून तिचा बाजार मांडण्याचा. रामायण, महाभारत किंवा कोणत्याही पौराणिक कथांमधून अनेक स्त्रियांच्या भावनांचा झालेला चुराडा हा त्यांनी केलेला त्याग म्हणून आजही स्त्रियांवर बिंबवला जातो. राजा रामाने नाही परंतु पती रामाने ऐन मातृत्वाच्या उंबरठ्यावर त्यागलेली सीता किंवा एक वचन सिद्धीला नेण्यासाठी रामाला वनवासाला पाठविल्यानंतर पुत्रविरहाचा प्याला रिचवायला विवश झालेली कौसल्या म्हणा. दोनही घटनांमधील पुरूषांची विवंचना, त्यांची पीडा पाहणारा समाज सीता आणि कौसल्येच्या मनातील द्वंदवापर्यंत कधी का पोहोचू शकला नाही? महाभारतामधील, वाटणी झालेली द्रौपदीचही तेच. मनोमन एकाला पती मान्य केल्यानंतर तिची भिक्षारूपी वाटणी होऊन तिच्या पदरी आलेला विचित्र संसार हे तिचं सौभाग्य कसं काय म्हणता येईल? द्युतात पणाला लावण्यासाठी तिचा देखील झालेला वापर हा केवळ लांछनास्पद परंतु त्यातही पांडवांची अगतिकता चित्रित होत राहते. हा सगळा इतिहास पाहता, स्त्री ही फार काही महत्त्वाची नसलेली परंतु वासनेचा मार्ग जिथे येऊन थांबतो अशी रोबोट सदृश्य वस्तू जी चालते, फिरते, सारी कामे करते, परंतु आदेशांचं उल्लंघन न करता, इतकच सिद्ध होतं.
त्यातून पुढे, चूल विझायची वेळ येऊ लागली तेव्हा तिचं रिंगण विस्तारत तिला नोकरी करण्याची, घराबाहेर जाण्याची मुभा मिळू लागली. घराबाहेरचं कुंपण न पाहिलेल्या तिला जसजसं बाहेरचं जग समजायला लागलं,तिच्या लक्षात येऊ लागलं की तिची माणसं जपण्यापलीकडे सवत:साठीही करण्यासारख असं भरपूर काही आहे. तिलाही स्वप्नं पडू लागली,तिच्या सुंदर भविष्याची. पण स्वत:चं भविष्य घडवताना तिच्या पाठीवर कायम अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं सतत लाधलेलं होत आणि ते ओझं आजही उतरलेलं नाही. शिकलेली, पुढच्या पिढीला घडवणारी स्त्री जेव्हा प्रगती करत असते तेव्हा एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून तिचं कौतुक होणं अपेक्षित असतं. उलटपक्षी, वारंवार तिच्या पायातील शृंखला अधिकाधिक करकचून  ठेवत असतात तिला. स्वत:ची वेगळी ओळख बनवताना कित्येकदा तिचे अगदी आपले तिची घरची ओळख विसरून जातात. आणि परत एकदा तोच मुद्दा, की सीतेने अग्निपरीक्षा दिली तर तुला आमच्या गचाळ शंकांचं निरसन करायला काय हरकत आहे? तू कोण एवढी मोठी लागून गेलीस, वगैरे, असो. त्यात कहर म्हणजे एक गोष्ट असते. कोणती माहित आहे का? सर्वच क्षेत्रांत पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आघाडी गाजवणारी स्त्री बहुदा त्याच पुरूषांच्या नजरेला नजर देण्यास असमर्थ ठरते. कारण, नजर द्यायला ती पुरूषी नजर बहुदा तिची नजर चुकवून तिचे अनेक कोपरे धुंडाळत असते. माझं असं अजिबात म्हणणं नाही की सगळेच पुरुष असेच असतात. पण तिचा डोळा चुकवून तिच्या आरपार झाकू पाहणारेच तुलनेने अधिक आहेत याबाबतीत स्वत:ला जणू एकपत्नी दर्शविणारे सोवळे राम देखील नकार देऊ शकत नाही.
                     रामायणात एका परटाने सीतेला त्यागण्याइतपत राजा रामाला विवश केलं होतं. आजच्या काळात असे कित्येक परीट शंकांचं काहूर उठवत असतात आणि मग चारित्र्याची परिक्षा, वादविवाद अन किंचित प्रसंगी होणारी मारहाण या साऱ्यातून कोणत्याही बाईच्या आत्म्याची लक्तरं निघतात. हे जरी मान्य केलं की प्रत्येक स्त्री ही सीता नाही तरी विचार करण्याची गोष्ट हीच आहे की सीता असण्याची वास्तविक काही गरज आहे का? विचारी होऊया आणि खऱ्या अर्थाने समानता राखूया, जेणेकरून काही राखीव ठेवायची गरजच उरणार नाही.

                                         ----धन्यवाद----

       
              

Friday, July 20, 2018

आईला घालून खड्ड्यात...पोर नाचतात झिंगाट...

       अरेच्चा…गाणं तर मुंबई गेली खड्ड्यात असं आहे ना? मग शीर्षकात मी 'आई गेली खड्ड्यात' असं का म्हणाले? पडला का असा प्रश्न? ज्या कोणाला हा प्रश्न पडला असेल त्यांना एक तर वादाचा मुद्दा लक्षातच आला नाही किंवा ते खऱ्या अर्थाने मुंबईकर नाहीत. मुंबईला मी आई असं का संबोधलं असेन? अहो, आई म्हणजे कोण? जी आपल्याला जन्म देते, आपलं रक्षण करते, आपलं पालनपोषण करते, कितीही वाईट परिस्थितीत पोटाशी धरते तीच आई ना? मग हे सारं आपली मुंबई करत नाही का? मग आपल्या आईला आपण खड्ड्यात घालून वर झिंगाट चं विडंबन करून नाचू का?
        विषय खड्ड्यांचाच आहे तर सर्वप्रथम आपण खड्ड्यांबद्दलच थोडाफार उहापोह करूयात. अगदी मान्य की आपल्या रस्त्यांवर बरेच ठिकाणी खड्डे आहेत पण खरंच रस्त्यांचं काम कधी होतच नाही का? नाही, असं अजिबात नसतं…'काम चालू, रस्ता बंद' हा फलक किती वेळा दिसला असेल आपल्याला? पण नेमकं तेव्हाच आपली गाडी दुसऱ्य दिशेने फिरवताना किती आठ्या पडतात कपाळावर? सारं काम होऊन नेमकं रस्ता चकचकीत होतो त्यानंतर तो चकचकीत रस्ता बऱ्याच कारणांसाठी नव्यानं खोदण्याची नानाविध कारणं Vodafone, Jio, Reliance, Gas Line अशा रूपाने पुढे येतात ज्या कामांची परवानगी थेट महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे मिळवली जाते. मुंबई महापालिका त्याला जबाबदार नसते. कंत्राट काम झाल्यानंतर तो रस्ता पूर्ववत न करता कामचलाऊ माती ढकलून केवळ वरवरची लाली पोतलेल्या गालांसारखा दिखावा केला जातो. तात्पर्य… मोठमोठाले खड्डे. याही उप्पर मुंबई चा आवाका कुठून कुठपर्यंत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र नक्की किती हे न जाणताच शिंतोडे उडवणं म्हणजे उचलली जीभ, लावली टाळ्याला असं झालं, नाही का? महानगरपालिकेवर एवढी नामुष्की यावी की बरेच रस्ते जे तिच्या अखत्यारित येत नाहीत तिथे पाट्या लावण्यात आल्या आहेत की ही मालमत्ता खाजगी असून सदर कामाची जबाबदारी महानगरपालिकेची नाही. विषयाला धरून आणखी एक मुद्दा इथे मांडावासा वाटतो तो असा की ज्याप्रमाणे मुंबईतील खड्डयांची चित्रे दाखला म्हणून दाखवून बिभत्स नृत्य केलं गेलं आहे त्याप्रमाणे Google नामक शोधयंत्रावर गुजरात, चेन्नई आणि इतर अनेक शहरे जिथे कोट्यावधी पैसे खर्चून बकाल रस्ते, मोठमोठाले खड्डे अशा चित्रांची उपलब्धी सहजी आपणा सर्वांना मिळू शकते. मग जिथे या परप्रांतीयांची उगमस्थाने असतात ती शहरे नसतात का खड्ड्यात?
         मान्य, रस्त्यांवरील खड्डे, कोसळणारे पादचारी पूल असे बरेच ऐरणीचे विषय आहेत ज्याचा समाधानकारक तोडगा निघालाच पाहिजे पण सतत केवळ चुका दाखवायच्या आणि जे काम अचूक आणि अविरत चालू आहे त्याकडे कानाडोळा करायचा यात कुठलं आलं शहाणपण? मध्य वैतरणा वरिल मोडक सागरधरण प्रकल्प जो केवळ मुंबई च्या शिरपेचात रोवला गेला आहे त्याबद्दल मुंबईकर म्हणून का अभिमान वाटू नये? मुंबईचं प्रवेशद्वार 'गेटवे ऑफ इंडिया' म्हणून नावाजलं गेलं आहे, 'गेटवे ऑफ मुंबई' नाही. यातच या शहराचं वर्चस्व ठळक होतं. या ठिकाणी वेळोवेळी होत असलेल्या सुधारणा का चित्रीत केल्या जात नाहीत? अत्यंत किरकोळ दरात शुद्धिकरण प्रक्रिया केलेलं पाणी आपल्या नळाला येतं. अविरत कार्यरत असणारे आशिया खंडातील सर्वात मोठे भांडुप संकुल जलप्रक्रिया केंद्र कुतूहल म्हणून तरी अवश्य पाहावे.
          आपल्यापैकी बहुतांशी अनेकांच्या घरातील वडिल माणसे व्यापार-उदीमासाठी म्हणा किंवा काबाडकष्ट करून चार पैसे गावाकडल्या आपल्या घरी पाठवायला म्हणा या मुंबापुरीत स्थलांतरित झाली. नंतर हळूहळू गावाहून लोंढेच्या लोंढे इथे आले आणि मग इथलेच झाले. त्यानंतर जन्मलेल्या, इथेच रूजलेल्या आपण पिढ्या अन रोजच प्रचंड संख्येने इथे आजही येणारे परकीय, आपली मुंबई साऱ्याचाच भार वाहते आहे. क्षेत्रफळाच्या मानाने कित्येक पटीने अधिक भार वाहणाऱ्या, रोज गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत साऱ्यांचच दळणवळण करणाऱ्या, पालनपोषण करणाऱ्या आपल्या मुंबईला खड्ड्यात घालू पाहतोय आपण? असं असेल तर मुंबईच देशाची आर्थिक राजधानी का आहे? एक मोठ्या लोकसंख्येला दहशतीखाली आणायचा विचार करून जेव्हा अतिरेकी हल्ले होतात तेव्हा मुंबईच केंद्रस्थानी का असते?
            कोणतीही स्थानिक संस्था म्हणा किंवा सरकार म्हणा ते चालवणारीही माणसंच आणि भरडली जाणारीही माणसच. पण एक साधा विचार आपल्या मनाला शिवला पाहिजे की परवडत नाही म्हणून कुटुंबाचा पसारा आपण अलीकडे आवरता घेतो आहोत  मग क्षेत्रफळ कमी, लोकसंख्या अधिक, संपूर्ण जनपाठिंबा नाही अशात मुंबई पुढील सर्वात मोठा प्रश्न कोणता? प्रश्न निश्चितच आहेत आणि ते सोडवणं अपरिहार्य आहेच पण प्रश्नाची मांडणी करताना स्वत:चं दुकान चालू ठेवायला बिनडोक पण गाजलेलं गाणं निवडायचं आणि त्याचं विडंबन विचित्र अंगविक्षेप करत, वेडंवाकडं नाचत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक पातळीवर वडवानलाप्रमाणे फोफावणाऱ्या सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या मुंबईला खड्ड्यात पाडणं आणि आपण त्याला देत असलेला पाठिंबा हे मुंबापुरीचं दुर्दैव म्हणावं लागेल. तक्रार असावी पण विवेक असावा. पाहा, पटतय का….


---अनघा





       
              

Saturday, June 2, 2018

देऊळ

                   देऊळ , मंदिर , देवालय कित्येक समानार्थी शब्दांनी नावाजलेलं आणि नाना धर्मांनुरुप बदलत्या स्वरुपाचं बांधकाम पण त्याचं अस्तित्व परमेश्वराचं निवासस्थान असंच आणि शिकवण ही बहुधा तिच. ती पोहोचविण्याची आणि आत्मसात करायची पद्धत केवळ विविध तऱ्हेची. या अनुषंगाने एक फार सुंदर पंक्ती वाचनात आल्या होत्या..त्या अशा…'मत रोक शराब पिनेसे मुझे मस्जिद में…या वह जगह दिखा दे जहाँ खुदा ना हो' किती सच्चेपणाचं विधान आहे, नाही का? ज्या परमेश्वराने विश्वनिर्मिती केली तो काही एका मंदिराच्या चौकटीपुरता मर्यादीत नाही. आता परमेश्वर आहे अथवा नाही, आस्तिक – नास्तिक हा वादाचा आणखी एक विषय. तुर्तास त्या विषयावर भाष्य नको.
                    आपल्या खाद्यरुचीकडे लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येते की आरोग्याच्या दृष्टीने हिताचे पदार्थ सहसा सपक असतात आणि औषधी पदार्थांचा तर,कडवटपणा हा अपरिहार्य गुण म्हणता येईल. याउलट, जीभेचे अतिशय आवडते, चमचमीत पदार्थ खाल्ल्याने शरिराला फायदा तर नाहीच पण झाल्यास अपाय होण्याची शक्यताच अधिक असते. ही बाब इथे मुद्दाम नमूद करायचं कारण असं की, परिणाम-दुष्परिणाम माहित असताना देखील वाम परंतु तितक्याच आकर्षक गोष्टी करायला आपली लालसा जागृत व्हायचा वेग जितका जलद तितकाच जास्त वेळ एखादं सत्कृत्य आपल्या हातून घडताना लागत असावा. एखादी गोष्ट चूक की बरोबर हे जरी व्यक्तिनिहाय बदलत असलं तरी एखादं विघातक कृत्य आपल्या हातून घडलं तर त्याचं आपल्याला शासन मिळेल हा धाक निर्माण करणारी शक्ती म्हणजेच देव.अनघा म्हणे, ‘अदृश्य तेचि आभास..दृश्य तया वंदितो ठेवुनी आस'. मूर्तिपूजा करताना अंतरात्म्यातील ईश्वरी शक्तीचा नाद ऐकू येईलच या विश्वासाने कदाचित मूर्तिपूजा सुरू झाली असावी. माणसाच्या ह्रदयमंदिरात देव राहत असला तरी आसुरी शक्तींचा पगडा कधीही जडच ठरतो. आणि सुरूवातीला उल्लेखलेल्या पंक्तींच्या विरुद्ध दृष्टीकोन सध्या पाहण्यात येतोय. तो म्हणजे मंदिराबाहेर काहीही वागा, काही बिघडत नाही मग मंदिरातील दगडाला तरी का भ्यायचं?
            ‘जस्टिस फॉर असिफा' म्हणून कितीही निषेध केला तरी सरकार दरबारी आपल्या WhatsApp च्या DP, Status किंवा Facebook च्या Wall Post ना काडीची किंमत नसते. मुळातच कोणत्या बातमीला किती वाजवायचं त्याचं वेगळच राजकारण असतं. दिल्लीत झालेलं निर्भया प्रकरण, तिच्या यातना, तिच्या देहापेक्षाही तिचा आत्मा छिन्न विछिन्न होऊन तडफड तडफड करुन आपल्यातून गेला. ती रात्री उशिरा का प्रवास करत होती आणि दिल्ली कसं सुरक्षित नाही यापेक्षा तिच्या अपराध्यांना वेळेत शिक्षा होणं महत्त्वाचं होतं. हो, कारण गुन्ह्याचं शासन वेळेत झालं तरच तो न्याय अन्यथा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला ते एक निमित्त बनतं. त्या निर्भया नंतरही कित्येक निर्भया बळी गेल्या, आजही जातच आहेत. एक दिवसाला सरासरी कित्येक मुलींचं लैंगिक शोषण, बलात्कार हे प्रकार सर्रास होत असतात. मग नुसतं नाममात्र निर्भया म्हणण्यात अर्थ तरी काय? निर्भय खरे बलात्कारी, अत्याचारी तेच नराधम… लहानपणी झाडांची फुलं खुडताना एखादी कळी खुडली गेली तरी आई रागवायची कारण त्या कळीची कळी खुलायच्या आत तिचं आयुष्य संपवणं पाप असतं ही आईची शिकवण होती. पण असिफा नावाची ती चिमुरडी,काय चुक त्या निष्पाप जीवाची की तिने इतक्या जीवघेण्या यातना भोगाव्यात. तिच्यावर गुदरला तो प्रसंग त्याला बलात्कार म्हणतात हेही न कळायचं वय तिचं. शिशु वय अन शि आणि शु इतकाच त्या नाजुक अवयवांचा वापर माहित असायचं वय असताना त्या कळ्यांना कसं आणि काय लैंगिक शिक्षण देणार आहोत आपण? मग काय, कुस्करलं जाऊ द्यायचं का त्या कळ्यांना? होऊ द्यायची त्यांची पायमल्ली? आणि त्या अन्यायाला तरी निदान जात धर्म, लिंग, वर्ण यांचा भेदाभेद नसावा. मुलींवरचा बलात्कार जितका अक्षम्य तितकाच त्या चिमुरड्या पोरांना अपहरण करून त्यांना खाण्यापिण्यास मोताद करणं, त्यांच्या अवयवांची तस्करी , त्यांना मारहाण करणं हा प्रकार निष्ठुर, निंदनीय आहे. हा सारा छळवाद पाहून खरंच देवाच्या असण्याबद्दल मन कधी कधी साशंक होतं.
              देव म्हणजे अधिक आणि दानव म्हणजे वजा असं जरी समजलं तरी अधिक आहे तिथे वजाही असायचच. सगळेच चांगले, गोड गोड वागावेत अशी अपेक्षा नाहीच करता येणार. पण आपल्या मन्मंदिराच्या गाभाऱ्यातला देव ईतुका तरी जागृत ठेवावा जेणेकरून कोणाच्या आयुष्याचा आपल्यामुळे पालापोचाळा होऊ नये. देवळात जाताना देवाला जागं करायला घंटानाद करतात. तसा थोडासा घंटानाद होऊ द्यात की आपल्या मनात…देऊळ म्हणजे आपणच ज्यात परमात्मा वास करतो. मग, त्या देवळाची झाडलोट करुयात का नियमित?

--अनघा

       
              

Tuesday, May 29, 2018

गावठी

           आगीचा शोध कसा लागला आठवतंय का? आता तुम्ही म्हणाल, की आगीच्या शोधाचा काय संबंध? दगडाला दगड घासून अग्नीची निर्मिती होते हा शोध आणखी कोणी नाही पण मानवानेच लावला होता.होमो इरेक्टस ते होमो सेपियन सेपियन, अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर माकड ते माणूस हा प्रवास करताना शरिरात, राहणीमानात पर्यायाने एकंदर जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत गेले अन पशुवत जीवन जगणारा माणूस कुटुंबव्यवस्थेचा निर्माणकर्ता होऊन काही नियम,मर्यादा यांच्या बंधनांचा उचित लगाम रोखून जगू लागला.
            दोन वेळची पोटची खळगी भरणं, पडेल ते काम मग ते कितीही कष्टाचं अन कोणत्याही स्वरूपाचं का असेना करायचं.त्यात कोणताही कमीपणा कुणाच्या काळजाला शिवायचा देखील नाही. कालांतराने उत्क्रांती घडत गेली. शिक्षणाची गरज, त्याचे फायदे आणि मुख्य म्हणजे शिक्षित-अशिक्षित हा भेद स्पष्ट दिसू लागला. दारिद्रय काही कमी होत नव्हतं.मग स्वाभाविकच घराघरातली शिकली सवरलेली मंडळी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षणाचा, त्यांच्या अंगभूत गुणांचा कस कितपत लागतो ते आजमावायला शहरांकडे वळू लागली. मनीऑर्डरींसोबत सुरूवातीला गावाकडे फिरणारी पावलं हळूहळू शहरी रेतीतच गाडली जाऊ लागली आणि तिथून खरंतर शहरी किंवा आधुनिक आणि 'गावठी' या भेदाची अदृश्य पण तितकीच ठळक रेघ आखली जाऊ लागली.
             आपला भारत देश महान आहेच आणि भारतीय म्हणून जन्मल्याचा मला सर्वोधिक अभिमान आहे. परंतु ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्यांची भाषा आपली राष्ट्रीय भाषा असल्यासारखी वागवली जाते. त्यांच्या जीवनशैलीचं अंधानुकरण केलं जातं हे कितपत योग्य आहे याचा सांगोपांग विचार केला गेला पाहिजे. कोणत्याही प्रदेशातील खानपान, राहणीमान हे तेथील एकंदर प्रादेशिक परिस्थितीवर अवलंबून असतं.किंबहुना ते तसं असणंच उचित असतं. गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात. आपल्या गरजांचा पाठलाग करत त्यावर तोडगे काढतच माकडातून माणूस आकाराला आला. नुसत्याच उड्या मारायची सवय गेल्याने ताठ झालेली पाठ, पाठीचं गेलेलं बाक आणि त्याहीउप्पर गळून गेलेलं ते उगाचच हलत डुलत राहणारं शेपूट हे सारेच उल्लेखनीय बदल होते. पण आजमितीला गरजेपोटी घडत जाणारं संशोधन नक्की गरज काय होती हेच विस्मृतीत न्यायला लागलंय की काय असं वाटायला लागलय. वेळ आणि श्रम यांचा अपव्यय टाळला जावा या सद्हेतूने जी उपकरणं, यंत्रसामुग्री आपल्या वापरात आली किंवा नव्याने येतच राहणार आहेत त्यांना आपण वापरतो आहोत की त्यांच्याकडून आपणच वापरले जात आहोत हा लाख मोलाचा प्रश्न म्हणता येईल. भूक भागली तरी खाणं आणि गरज नसलेल्या वस्तूंचा साठा करणं हे आधुनिकीकरणाच्या नावाखाली अंधानुकरण करणाऱ्या शहरीपणाचं लक्षण. याउलट, आहे त्या परिस्थितीत सुखाने जगणारे, आपल्या मातीचा सुगंध ज्यांच्या देहबोलीतून येतो ते गावठी.
                आपलं काय चुकतय माहित आहे का? आपण सुख आणि समाधान यात गल्लत करतो. सुख बऱ्याच गोष्टींमध्ये मिळू शकेलही.पण समाधान साधं सरळ जगण्यात आहे.बाकी कशातच नाही. मखमली बिछान्यात रात्रभर कितीही लोळत राहिलो तरी ज्या शांत झोपेच्या शोधात रात्रभर कुस बदलत राहणं इतकच करता येतं तिथे भरगच्च चांदण्यांचा शालू नेसलेल्या आभाळाचं लोभस सौंदर्य पाहताना तिच झोप कधी लागते आपलं आपल्यालाही कळत नाही. स्वप्नं पाहायलाच हवीत. त्यांच्या पूर्तीचा ध्यास देखील लागायलाच हवा. पण म्हणून आपलं गाव, गावच्या मातीची ओढ कमी होता कामा नये.
              तेलानं चोपडलेले केस,नऊवारी लुगडं, शेतात काम करून माती जाऊन बोथटलेली नखं आणि मुखात अस्सल गावठी भाषा असं व्यक्तीवैभव पाहताना आपली गावची म्हातारी आठवली पाहिजे. ईईईईईयुयुयुयु…….कसली गावठी बाई आहे!!!!! असं म्हणून नाकं मुरडणं म्हणजे माणूस ते माकड असा अधोगतीचा प्रवास म्हणावा लागेल. कारण सगळे करतात ती फॅशन बनत असली तरी फॅशन हेच जगण्याचं शासन ठरू शकत नाही.

--अनघा
              

Monday, May 21, 2018

लॉस्ट इन मी...फाऊन्ड इन यु...

     
      सर्वप्रथम आजवर मी करीत आलेल्या लिखाणाला तुम्ही साऱ्यांनीच भरभरून प्रतिसाद दिलात तसेच 'अंतरंगातील इंद्रधनुष्य’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला स्विकारलत यासाठी मनापासून आभार मानते. कलाकार मग तो कोणत्याही कलेचा धनी का असेना दर्दी रसिकांची दाद मिळते तेव्हाच कलेचं इतिकर्तव्य पुरं होतं. ब्लॉगसंस्कृतीचा फारसा अनुभव नसल्यामुळे जे काही उणे अधिक राहील त्याबाबत सुरूवातीलाच क्षमाप्रार्थी आहे.
      मथळा 'लॉस्ट इन मी…फाऊन्ड इन यु’ काय सुचवू पाहतोय हे आता ओघाने समजत जाणारच आहे. स्वत:च्याच एकाकीपणामध्ये हरवलेले आपण म्हणजे येन केन प्रकारेण बहुतांशी आपण सारेच. असंख्य रूपे असलेलं हे एकाकीपण जरी व्यक्तीपरत्वे भिन्न असलं तरी त्याचा उपचार घ्यायला दुर्दैवाने तो काही विकार नाही आणि ज्याला त्याला आलेलं एकाकीपण हर तऱ्हेने वेगळं असतं. कुणी जोडीदाराच्या विरहाने एकटं पडलेलं असतं तर कुणी एकाच छताखाली एकमेकांना पारखे होऊन आपापल्या जगात वावरत असतात. कुठे आजी-आजोबांच्या गोष्टींशिवायच लहानग्यांचं बालपण अपूर्ण राहतं तर कुठे थरथरत्या हातांनी पोटची खळगी भरताना विचित्र नैराश्य बोचत असतं. बोहल्यावर चढताना आजुबाजुला अख्खा कुटुंबकबिला का असेना पण आपल्या जन्मदात्या मातापित्यापैकी कुणी अस्तित्वात नसेल तर त्या वेळचं एकटेपण कमालीचं दयनीय असतं. सणाचं औचित्य साजरं करायला आपली व्यक्तिच जवळ नसेल तर तो सण तोच आनंद घेऊन येतो का? सत्यवान जवळ नसला तर सावित्रीच्या व्रताची पूर्ती होईल का? भावाविना राखी पौर्णिमा पुरी होऊ शकेल का? दिवसभरच्या कामांमधून दुपारचं कोणीच सोबत नसल्याने आलेलं अटळ  एकटेपण ही देखील घरच्या गृहिणीची फारशी लक्षातही न येणारी भ्रांतच होय.कधी असंही होतं की आपल्यापाशी सारंकाही आहे, आपल्या एका हाकेसरशी धावून येणारेही अमाप आहेत पण नेमकी ती व्यक्ति नाही जी अगदी त्या क्षणाला सोबत हवी असते आणि तिच्या नसण्याने सगळं असूनही काहीच नसतं. मन धुमसत राहतं, चिडचिड करत, चरफडत राहतं पण या साऱ्याने निष्पन्न काहीच होत नाही.
        सुख आणि प्रेम या दोनच अगम्य आणि तितक्याच साध्या सरळ गोष्टी दिल्याने वाढतात. अन्यथा वाटल्याने कमीच होणाऱ्या गोष्टींना एकटेपणाही अपवाद नाही. आपलं मन मुळातच भौतिक असो वा भावनिक, परंतु आपल्यापाशी नसणाऱ्या गोष्टींचाच धावा करत राहतं. मग आपलच दु:ख आभाळाएवढं अन इतरांचं कस्पटासमान ही परिस्थिती होते. स्वत:ला कशात ना कशात रमवलं की मनालाही कळत नाही आपण एकटे वगैरे आहोत.  We find ourselves in someone’s lonely space… म्हणूनच…for every 'lost in me…' there’s a ‘found in you’option…दुसऱ्याचं एकटेपण वाटून घ्यायचा प्रयत्न केला तर स्वत:चा स्वत:ला नव्याने शोध लागतो. आपणच आपल्याला नव्याने गवसतो. करूया का मग प्रयत्न?


----नमस्कार----
अनघा