Tuesday, May 29, 2018

गावठी

           आगीचा शोध कसा लागला आठवतंय का? आता तुम्ही म्हणाल, की आगीच्या शोधाचा काय संबंध? दगडाला दगड घासून अग्नीची निर्मिती होते हा शोध आणखी कोणी नाही पण मानवानेच लावला होता.होमो इरेक्टस ते होमो सेपियन सेपियन, अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर माकड ते माणूस हा प्रवास करताना शरिरात, राहणीमानात पर्यायाने एकंदर जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत गेले अन पशुवत जीवन जगणारा माणूस कुटुंबव्यवस्थेचा निर्माणकर्ता होऊन काही नियम,मर्यादा यांच्या बंधनांचा उचित लगाम रोखून जगू लागला.
            दोन वेळची पोटची खळगी भरणं, पडेल ते काम मग ते कितीही कष्टाचं अन कोणत्याही स्वरूपाचं का असेना करायचं.त्यात कोणताही कमीपणा कुणाच्या काळजाला शिवायचा देखील नाही. कालांतराने उत्क्रांती घडत गेली. शिक्षणाची गरज, त्याचे फायदे आणि मुख्य म्हणजे शिक्षित-अशिक्षित हा भेद स्पष्ट दिसू लागला. दारिद्रय काही कमी होत नव्हतं.मग स्वाभाविकच घराघरातली शिकली सवरलेली मंडळी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षणाचा, त्यांच्या अंगभूत गुणांचा कस कितपत लागतो ते आजमावायला शहरांकडे वळू लागली. मनीऑर्डरींसोबत सुरूवातीला गावाकडे फिरणारी पावलं हळूहळू शहरी रेतीतच गाडली जाऊ लागली आणि तिथून खरंतर शहरी किंवा आधुनिक आणि 'गावठी' या भेदाची अदृश्य पण तितकीच ठळक रेघ आखली जाऊ लागली.
             आपला भारत देश महान आहेच आणि भारतीय म्हणून जन्मल्याचा मला सर्वोधिक अभिमान आहे. परंतु ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्यांची भाषा आपली राष्ट्रीय भाषा असल्यासारखी वागवली जाते. त्यांच्या जीवनशैलीचं अंधानुकरण केलं जातं हे कितपत योग्य आहे याचा सांगोपांग विचार केला गेला पाहिजे. कोणत्याही प्रदेशातील खानपान, राहणीमान हे तेथील एकंदर प्रादेशिक परिस्थितीवर अवलंबून असतं.किंबहुना ते तसं असणंच उचित असतं. गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात. आपल्या गरजांचा पाठलाग करत त्यावर तोडगे काढतच माकडातून माणूस आकाराला आला. नुसत्याच उड्या मारायची सवय गेल्याने ताठ झालेली पाठ, पाठीचं गेलेलं बाक आणि त्याहीउप्पर गळून गेलेलं ते उगाचच हलत डुलत राहणारं शेपूट हे सारेच उल्लेखनीय बदल होते. पण आजमितीला गरजेपोटी घडत जाणारं संशोधन नक्की गरज काय होती हेच विस्मृतीत न्यायला लागलंय की काय असं वाटायला लागलय. वेळ आणि श्रम यांचा अपव्यय टाळला जावा या सद्हेतूने जी उपकरणं, यंत्रसामुग्री आपल्या वापरात आली किंवा नव्याने येतच राहणार आहेत त्यांना आपण वापरतो आहोत की त्यांच्याकडून आपणच वापरले जात आहोत हा लाख मोलाचा प्रश्न म्हणता येईल. भूक भागली तरी खाणं आणि गरज नसलेल्या वस्तूंचा साठा करणं हे आधुनिकीकरणाच्या नावाखाली अंधानुकरण करणाऱ्या शहरीपणाचं लक्षण. याउलट, आहे त्या परिस्थितीत सुखाने जगणारे, आपल्या मातीचा सुगंध ज्यांच्या देहबोलीतून येतो ते गावठी.
                आपलं काय चुकतय माहित आहे का? आपण सुख आणि समाधान यात गल्लत करतो. सुख बऱ्याच गोष्टींमध्ये मिळू शकेलही.पण समाधान साधं सरळ जगण्यात आहे.बाकी कशातच नाही. मखमली बिछान्यात रात्रभर कितीही लोळत राहिलो तरी ज्या शांत झोपेच्या शोधात रात्रभर कुस बदलत राहणं इतकच करता येतं तिथे भरगच्च चांदण्यांचा शालू नेसलेल्या आभाळाचं लोभस सौंदर्य पाहताना तिच झोप कधी लागते आपलं आपल्यालाही कळत नाही. स्वप्नं पाहायलाच हवीत. त्यांच्या पूर्तीचा ध्यास देखील लागायलाच हवा. पण म्हणून आपलं गाव, गावच्या मातीची ओढ कमी होता कामा नये.
              तेलानं चोपडलेले केस,नऊवारी लुगडं, शेतात काम करून माती जाऊन बोथटलेली नखं आणि मुखात अस्सल गावठी भाषा असं व्यक्तीवैभव पाहताना आपली गावची म्हातारी आठवली पाहिजे. ईईईईईयुयुयुयु…….कसली गावठी बाई आहे!!!!! असं म्हणून नाकं मुरडणं म्हणजे माणूस ते माकड असा अधोगतीचा प्रवास म्हणावा लागेल. कारण सगळे करतात ती फॅशन बनत असली तरी फॅशन हेच जगण्याचं शासन ठरू शकत नाही.

--अनघा
              

Monday, May 21, 2018

लॉस्ट इन मी...फाऊन्ड इन यु...

     
      सर्वप्रथम आजवर मी करीत आलेल्या लिखाणाला तुम्ही साऱ्यांनीच भरभरून प्रतिसाद दिलात तसेच 'अंतरंगातील इंद्रधनुष्य’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला स्विकारलत यासाठी मनापासून आभार मानते. कलाकार मग तो कोणत्याही कलेचा धनी का असेना दर्दी रसिकांची दाद मिळते तेव्हाच कलेचं इतिकर्तव्य पुरं होतं. ब्लॉगसंस्कृतीचा फारसा अनुभव नसल्यामुळे जे काही उणे अधिक राहील त्याबाबत सुरूवातीलाच क्षमाप्रार्थी आहे.
      मथळा 'लॉस्ट इन मी…फाऊन्ड इन यु’ काय सुचवू पाहतोय हे आता ओघाने समजत जाणारच आहे. स्वत:च्याच एकाकीपणामध्ये हरवलेले आपण म्हणजे येन केन प्रकारेण बहुतांशी आपण सारेच. असंख्य रूपे असलेलं हे एकाकीपण जरी व्यक्तीपरत्वे भिन्न असलं तरी त्याचा उपचार घ्यायला दुर्दैवाने तो काही विकार नाही आणि ज्याला त्याला आलेलं एकाकीपण हर तऱ्हेने वेगळं असतं. कुणी जोडीदाराच्या विरहाने एकटं पडलेलं असतं तर कुणी एकाच छताखाली एकमेकांना पारखे होऊन आपापल्या जगात वावरत असतात. कुठे आजी-आजोबांच्या गोष्टींशिवायच लहानग्यांचं बालपण अपूर्ण राहतं तर कुठे थरथरत्या हातांनी पोटची खळगी भरताना विचित्र नैराश्य बोचत असतं. बोहल्यावर चढताना आजुबाजुला अख्खा कुटुंबकबिला का असेना पण आपल्या जन्मदात्या मातापित्यापैकी कुणी अस्तित्वात नसेल तर त्या वेळचं एकटेपण कमालीचं दयनीय असतं. सणाचं औचित्य साजरं करायला आपली व्यक्तिच जवळ नसेल तर तो सण तोच आनंद घेऊन येतो का? सत्यवान जवळ नसला तर सावित्रीच्या व्रताची पूर्ती होईल का? भावाविना राखी पौर्णिमा पुरी होऊ शकेल का? दिवसभरच्या कामांमधून दुपारचं कोणीच सोबत नसल्याने आलेलं अटळ  एकटेपण ही देखील घरच्या गृहिणीची फारशी लक्षातही न येणारी भ्रांतच होय.कधी असंही होतं की आपल्यापाशी सारंकाही आहे, आपल्या एका हाकेसरशी धावून येणारेही अमाप आहेत पण नेमकी ती व्यक्ति नाही जी अगदी त्या क्षणाला सोबत हवी असते आणि तिच्या नसण्याने सगळं असूनही काहीच नसतं. मन धुमसत राहतं, चिडचिड करत, चरफडत राहतं पण या साऱ्याने निष्पन्न काहीच होत नाही.
        सुख आणि प्रेम या दोनच अगम्य आणि तितक्याच साध्या सरळ गोष्टी दिल्याने वाढतात. अन्यथा वाटल्याने कमीच होणाऱ्या गोष्टींना एकटेपणाही अपवाद नाही. आपलं मन मुळातच भौतिक असो वा भावनिक, परंतु आपल्यापाशी नसणाऱ्या गोष्टींचाच धावा करत राहतं. मग आपलच दु:ख आभाळाएवढं अन इतरांचं कस्पटासमान ही परिस्थिती होते. स्वत:ला कशात ना कशात रमवलं की मनालाही कळत नाही आपण एकटे वगैरे आहोत.  We find ourselves in someone’s lonely space… म्हणूनच…for every 'lost in me…' there’s a ‘found in you’option…दुसऱ्याचं एकटेपण वाटून घ्यायचा प्रयत्न केला तर स्वत:चा स्वत:ला नव्याने शोध लागतो. आपणच आपल्याला नव्याने गवसतो. करूया का मग प्रयत्न?


----नमस्कार----
अनघा