Monday, June 8, 2020

Soul Rests in You

ती.....तशी प्रसंगी खंबीर, धीट, हुशार, सुंदर आणि वेळप्रसंगी तितकीच चिडकी, उथळ, बावळट देखील..आणि मग तिच्या सौंदर्याला भुलून जवळ आलेले प्रेमाचा डोलारा जास्त वाढला की दबून जाण्याच्या भीतीने पळून जात असावेत असं काहीसं घडत आलंय तिच्या बाबतीत..
तिचा आवडता विषय गणित होता, तसा तो इतिहास ही होता..म्हणून कदाचित तिचा इतिहास सांगताना तिच्या चारित्र्याचा अंदाज वगैरे काढला जाईल का, हा विचार न करताच ती स्वतःच्या इतिहासाचं परत परत उत्खनन करत राहते आणि समोर ठेवते त्यातून निष्पन्न झालेले सारं काही, तिच्या "तो" पुढे...
दर वेळी कदाचित एखादा "तो" वाढलेला असतो..याही वेळी तिने ठरवलेलं असतं, गुंतायचं नाही. प्रेमाचं गणित जमलेलं नाही तिला. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नाही..तिच्या प्रेमाला बांध नाहीच घालता येत तिला. खळाळणाऱ्या नदीसारखं वाहत जायचं आणि प्रवाहात त्याची साथ हवीच हा एकमात्र हट्ट असतो तिचा. कधी कधी तो जाच वाटत जातो आणि ह्याची जाणीव होताना ती तिची पकड त्याच्याही नकळत सैल करत जाते. तिला प्रेम करता येतं आणि निभावताही..
यावेळी मात्र तिला तिच्या असण्याचा त्रास त्याला व्हायला नकोय.
कारण तिने त्याला, पहिलं प्रेम, दुसरं प्रेम असे बरेच आकडे सांगितले असले तरी पौगंडावस्थेतील त्या विचित्र भावनेला प्रेम म्हणता येईल का या संभ्रमात ती तेव्हाही होतीच की..मग तिच्या वर्तुळाबाहेरचा कोणीतरी वेगळा वाटतो म्हणून आवडतो नंतर आवाक्याबाहेर जातोय असं वाटून नकोसाही.. असं बरंच काही घडल्यानंतर आज मात्र "त्याच्या" बाबतीत ती थोडी जास्तच भित्री झालीय. काही करून हे प्रेम तिला जपायचंय कारण तिचं असणं,त्याचं हसणं होताना तिला दिसतंय आणि त्याच्या कुशीत तिला जगणं सापडतंय... आजवर वाटत आलं ते काय या प्रश्नात तिला स्वारस्य नाहीच..
तिला त्याच्यासोबत वाहता येतं, त्याला तिचं खळाळणं आवडतं आणि तिचा बावळटपणाही..
ती वरचेवर त्याला एकच म्हणत असते..."Love The Way You Love me... Soul Rests In You"

Tuesday, January 28, 2020

गोष्ट एका प्रेमाची

यमुनातीरावर ते दोघं बसले होते.कृष्ण कृष्ण आणि राधा ही कृष्ण.  कृष्ण त्याचा अत्यंत लाडका पावा वाजवत होता आणि सोबत त्याची अतिप्रिय राधा. तो क्षण इतका दैवी वाटावा की एखाद्या लोभस चित्रात बंद करून ठेवावा की काय असा मोह व्हावा .
कृष्ण पावा वाजवत असतानाची त्याची मुद्रा राधा नेहमीच डोळ्यांत साठवून ठेवत असे. कृष्ण तिच्या भाबडीच्या वाट्याला यायचाच केवढासा म्हणा. म्हणूनच की काय, ही तसबीर ती डोळयातून घटाघटा साठवत तिच्या आठवणीसाठीची शिदोरी जपून ठेवत असे. पण हे काय, आज राधेच्या डोळ्यांत आलेले अश्रू आनंदाचे का बरं वाटत नाहीत?
मोठ्या मुश्किलीने राधेने घशातून ओठांवर येऊ घातलेला हुंदका गच्च मिटला. तिच्या कोणत्याच वागण्याने तिला तिच्या कृष्णाला दुखवायचं नव्हतंच. पण राधा गहिवरली आहे आणि कृष्ण अनभिज्ञ राहील असं होईल का? पावा थांबला. कृष्णाने अलगद डोळे उघडले आणि राधेच्या चेहऱ्यावरील सारे भाव चटकन त्याचा डोळ्यांतून तरळले. तरीही त्याला तिच्या तोंडून ऐकायची होती तिची शंका जिने राधेच्या मनाच्या तीरावर आज लाटा उसळल्या होत्या. कृष्णाने विचारलं “ राधे, काही चुकलं का ग माझं? आज तुझा चेहरा असा दुःखी का? “ राधेने उसनं हसू आणत कृष्णाचा प्रश्न टाळू पाहिला पण कृष्णाच्या हट्टापुढे राधेचा कितीसा निभाव लागणार होता.
अखेर, राधेने कृष्णाला म्हटलं, “तू साऱ्या जगाचा असतानाही मला कसलीच चिंता नसते कारण साऱ्यात असूनही तू फक्त माझा असतोस. पण....”
कृष्ण: पण काय राधे?
राधा: तुला तुझा पावा प्रिय की मी रे?
कृष्णाने राधेला दिलेलं उत्तर असं होतं “ मला पावा याचसाठी आवडतो, कारण तू सोबत असतानाचा प्रत्येक क्षण मी माझ्या बोटांनी या रंध्रात साठवून तुझ्या मुर्तीला आणि या क्षणाला माझ्या गळ्यात अमर करु शकतो”
राधेला कृष्णाच्या नजरेत एक वेगळीच राधा सापडली....