अरेच्चा…गाणं तर मुंबई गेली खड्ड्यात असं आहे ना? मग शीर्षकात मी 'आई गेली खड्ड्यात' असं का म्हणाले? पडला का असा प्रश्न? ज्या कोणाला हा प्रश्न पडला असेल त्यांना एक तर वादाचा मुद्दा लक्षातच आला नाही किंवा ते खऱ्या अर्थाने मुंबईकर नाहीत. मुंबईला मी आई असं का संबोधलं असेन? अहो, आई म्हणजे कोण? जी आपल्याला जन्म देते, आपलं रक्षण करते, आपलं पालनपोषण करते, कितीही वाईट परिस्थितीत पोटाशी धरते तीच आई ना? मग हे सारं आपली मुंबई करत नाही का? मग आपल्या आईला आपण खड्ड्यात घालून वर झिंगाट चं विडंबन करून नाचू का?
विषय खड्ड्यांचाच आहे तर सर्वप्रथम आपण खड्ड्यांबद्दलच थोडाफार उहापोह करूयात. अगदी मान्य की आपल्या रस्त्यांवर बरेच ठिकाणी खड्डे आहेत पण खरंच रस्त्यांचं काम कधी होतच नाही का? नाही, असं अजिबात नसतं…'काम चालू, रस्ता बंद' हा फलक किती वेळा दिसला असेल आपल्याला? पण नेमकं तेव्हाच आपली गाडी दुसऱ्य दिशेने फिरवताना किती आठ्या पडतात कपाळावर? सारं काम होऊन नेमकं रस्ता चकचकीत होतो त्यानंतर तो चकचकीत रस्ता बऱ्याच कारणांसाठी नव्यानं खोदण्याची नानाविध कारणं Vodafone, Jio, Reliance, Gas Line अशा रूपाने पुढे येतात ज्या कामांची परवानगी थेट महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे मिळवली जाते. मुंबई महापालिका त्याला जबाबदार नसते. कंत्राट काम झाल्यानंतर तो रस्ता पूर्ववत न करता कामचलाऊ माती ढकलून केवळ वरवरची लाली पोतलेल्या गालांसारखा दिखावा केला जातो. तात्पर्य… मोठमोठाले खड्डे. याही उप्पर मुंबई चा आवाका कुठून कुठपर्यंत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र नक्की किती हे न जाणताच शिंतोडे उडवणं म्हणजे उचलली जीभ, लावली टाळ्याला असं झालं, नाही का? महानगरपालिकेवर एवढी नामुष्की यावी की बरेच रस्ते जे तिच्या अखत्यारित येत नाहीत तिथे पाट्या लावण्यात आल्या आहेत की ही मालमत्ता खाजगी असून सदर कामाची जबाबदारी महानगरपालिकेची नाही. विषयाला धरून आणखी एक मुद्दा इथे मांडावासा वाटतो तो असा की ज्याप्रमाणे मुंबईतील खड्डयांची चित्रे दाखला म्हणून दाखवून बिभत्स नृत्य केलं गेलं आहे त्याप्रमाणे Google नामक शोधयंत्रावर गुजरात, चेन्नई आणि इतर अनेक शहरे जिथे कोट्यावधी पैसे खर्चून बकाल रस्ते, मोठमोठाले खड्डे अशा चित्रांची उपलब्धी सहजी आपणा सर्वांना मिळू शकते. मग जिथे या परप्रांतीयांची उगमस्थाने असतात ती शहरे नसतात का खड्ड्यात?
मान्य, रस्त्यांवरील खड्डे, कोसळणारे पादचारी पूल असे बरेच ऐरणीचे विषय आहेत ज्याचा समाधानकारक तोडगा निघालाच पाहिजे पण सतत केवळ चुका दाखवायच्या आणि जे काम अचूक आणि अविरत चालू आहे त्याकडे कानाडोळा करायचा यात कुठलं आलं शहाणपण? मध्य वैतरणा वरिल मोडक सागरधरण प्रकल्प जो केवळ मुंबई च्या शिरपेचात रोवला गेला आहे त्याबद्दल मुंबईकर म्हणून का अभिमान वाटू नये? मुंबईचं प्रवेशद्वार 'गेटवे ऑफ इंडिया' म्हणून नावाजलं गेलं आहे, 'गेटवे ऑफ मुंबई' नाही. यातच या शहराचं वर्चस्व ठळक होतं. या ठिकाणी वेळोवेळी होत असलेल्या सुधारणा का चित्रीत केल्या जात नाहीत? अत्यंत किरकोळ दरात शुद्धिकरण प्रक्रिया केलेलं पाणी आपल्या नळाला येतं. अविरत कार्यरत असणारे आशिया खंडातील सर्वात मोठे भांडुप संकुल जलप्रक्रिया केंद्र कुतूहल म्हणून तरी अवश्य पाहावे.
आपल्यापैकी बहुतांशी अनेकांच्या घरातील वडिल माणसे व्यापार-उदीमासाठी म्हणा किंवा काबाडकष्ट करून चार पैसे गावाकडल्या आपल्या घरी पाठवायला म्हणा या मुंबापुरीत स्थलांतरित झाली. नंतर हळूहळू गावाहून लोंढेच्या लोंढे इथे आले आणि मग इथलेच झाले. त्यानंतर जन्मलेल्या, इथेच रूजलेल्या आपण पिढ्या अन रोजच प्रचंड संख्येने इथे आजही येणारे परकीय, आपली मुंबई साऱ्याचाच भार वाहते आहे. क्षेत्रफळाच्या मानाने कित्येक पटीने अधिक भार वाहणाऱ्या, रोज गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत साऱ्यांचच दळणवळण करणाऱ्या, पालनपोषण करणाऱ्या आपल्या मुंबईला खड्ड्यात घालू पाहतोय आपण? असं असेल तर मुंबईच देशाची आर्थिक राजधानी का आहे? एक मोठ्या लोकसंख्येला दहशतीखाली आणायचा विचार करून जेव्हा अतिरेकी हल्ले होतात तेव्हा मुंबईच केंद्रस्थानी का असते?
कोणतीही स्थानिक संस्था म्हणा किंवा सरकार म्हणा ते चालवणारीही माणसंच आणि भरडली जाणारीही माणसच. पण एक साधा विचार आपल्या मनाला शिवला पाहिजे की परवडत नाही म्हणून कुटुंबाचा पसारा आपण अलीकडे आवरता घेतो आहोत मग क्षेत्रफळ कमी, लोकसंख्या अधिक, संपूर्ण जनपाठिंबा नाही अशात मुंबई पुढील सर्वात मोठा प्रश्न कोणता? प्रश्न निश्चितच आहेत आणि ते सोडवणं अपरिहार्य आहेच पण प्रश्नाची मांडणी करताना स्वत:चं दुकान चालू ठेवायला बिनडोक पण गाजलेलं गाणं निवडायचं आणि त्याचं विडंबन विचित्र अंगविक्षेप करत, वेडंवाकडं नाचत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक पातळीवर वडवानलाप्रमाणे फोफावणाऱ्या सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या मुंबईला खड्ड्यात पाडणं आणि आपण त्याला देत असलेला पाठिंबा हे मुंबापुरीचं दुर्दैव म्हणावं लागेल. तक्रार असावी पण विवेक असावा. पाहा, पटतय का….
---अनघा
बोलविता धनी परमात्मा...आम्ही निमित्त मात्र.... सर्वज्ञात आहेतच अशा गोष्टींवर कवडसा पडेल अन लख्ख होईल धुसर चित्र...
Friday, July 20, 2018
आईला घालून खड्ड्यात...पोर नाचतात झिंगाट...
Subscribe to:
Posts (Atom)