छे हो..रामायणाचा अपभ्रंश वगैरे नाही काही. हो, पण रामायणाशी साधर्म्य साधणारा किंवा रामायणापासून आजपावेतो तिळमात्रही न बदललेला एक विषय आहेच.बरं, असही नाही की या विषयावर भाष्य झालेलं नाही.तरीही अति सकारात्मक भूमिका असंही म्हणू शकता की मला आपलं राहून राहून वाटतं की एक परिस्थिती आहे जी कधीतरी नक्की बदलेल म्हणून हा लेख.
रामायण ते मारायण अशासाठी संबोधलं की स्त्री ही एक व्यक्ती, एक स्वतंत्र भावना न समजता ती केवळ एक उपभोग्य वस्तू हीच मानसिकता आजही कायम आहेच. उपहासाची बाब म्हणजे, रामायण असो वा महाभारत ते एका स्त्रीमुळेच घडलं असं थट्टेत म्हणतो आपण. पण तितक्याच सहजतेने कित्येक जण 'बाई आणि बाटलीची' सोय गृहीत धरून त्यावर त्यांच्या कार्याची इतिकर्तव्यता ठरत असते. यातील नीतीमत्ता किंवा नैतिकता हा माझा विषय या लेखापुरता तरी नाही. प्रश्न आहे तो बाई नावाच्या व्यक्तीचं व्यक्तित्व झुगारून तिचा बाजार मांडण्याचा. रामायण, महाभारत किंवा कोणत्याही पौराणिक कथांमधून अनेक स्त्रियांच्या भावनांचा झालेला चुराडा हा त्यांनी केलेला त्याग म्हणून आजही स्त्रियांवर बिंबवला जातो. राजा रामाने नाही परंतु पती रामाने ऐन मातृत्वाच्या उंबरठ्यावर त्यागलेली सीता किंवा एक वचन सिद्धीला नेण्यासाठी रामाला वनवासाला पाठविल्यानंतर पुत्रविरहाचा प्याला रिचवायला विवश झालेली कौसल्या म्हणा. दोनही घटनांमधील पुरूषांची विवंचना, त्यांची पीडा पाहणारा समाज सीता आणि कौसल्येच्या मनातील द्वंदवापर्यंत कधी का पोहोचू शकला नाही? महाभारतामधील, वाटणी झालेली द्रौपदीचही तेच. मनोमन एकाला पती मान्य केल्यानंतर तिची भिक्षारूपी वाटणी होऊन तिच्या पदरी आलेला विचित्र संसार हे तिचं सौभाग्य कसं काय म्हणता येईल? द्युतात पणाला लावण्यासाठी तिचा देखील झालेला वापर हा केवळ लांछनास्पद परंतु त्यातही पांडवांची अगतिकता चित्रित होत राहते. हा सगळा इतिहास पाहता, स्त्री ही फार काही महत्त्वाची नसलेली परंतु वासनेचा मार्ग जिथे येऊन थांबतो अशी रोबोट सदृश्य वस्तू जी चालते, फिरते, सारी कामे करते, परंतु आदेशांचं उल्लंघन न करता, इतकच सिद्ध होतं.
त्यातून पुढे, चूल विझायची वेळ येऊ लागली तेव्हा तिचं रिंगण विस्तारत तिला नोकरी करण्याची, घराबाहेर जाण्याची मुभा मिळू लागली. घराबाहेरचं कुंपण न पाहिलेल्या तिला जसजसं बाहेरचं जग समजायला लागलं,तिच्या लक्षात येऊ लागलं की तिची माणसं जपण्यापलीकडे सवत:साठीही करण्यासारख असं भरपूर काही आहे. तिलाही स्वप्नं पडू लागली,तिच्या सुंदर भविष्याची. पण स्वत:चं भविष्य घडवताना तिच्या पाठीवर कायम अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं सतत लाधलेलं होत आणि ते ओझं आजही उतरलेलं नाही. शिकलेली, पुढच्या पिढीला घडवणारी स्त्री जेव्हा प्रगती करत असते तेव्हा एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून तिचं कौतुक होणं अपेक्षित असतं. उलटपक्षी, वारंवार तिच्या पायातील शृंखला अधिकाधिक करकचून ठेवत असतात तिला. स्वत:ची वेगळी ओळख बनवताना कित्येकदा तिचे अगदी आपले तिची घरची ओळख विसरून जातात. आणि परत एकदा तोच मुद्दा, की सीतेने अग्निपरीक्षा दिली तर तुला आमच्या गचाळ शंकांचं निरसन करायला काय हरकत आहे? तू कोण एवढी मोठी लागून गेलीस, वगैरे, असो. त्यात कहर म्हणजे एक गोष्ट असते. कोणती माहित आहे का? सर्वच क्षेत्रांत पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आघाडी गाजवणारी स्त्री बहुदा त्याच पुरूषांच्या नजरेला नजर देण्यास असमर्थ ठरते. कारण, नजर द्यायला ती पुरूषी नजर बहुदा तिची नजर चुकवून तिचे अनेक कोपरे धुंडाळत असते. माझं असं अजिबात म्हणणं नाही की सगळेच पुरुष असेच असतात. पण तिचा डोळा चुकवून तिच्या आरपार झाकू पाहणारेच तुलनेने अधिक आहेत याबाबतीत स्वत:ला जणू एकपत्नी दर्शविणारे सोवळे राम देखील नकार देऊ शकत नाही.
रामायणात एका परटाने सीतेला त्यागण्याइतपत राजा रामाला विवश केलं होतं. आजच्या काळात असे कित्येक परीट शंकांचं काहूर उठवत असतात आणि मग चारित्र्याची परिक्षा, वादविवाद अन किंचित प्रसंगी होणारी मारहाण या साऱ्यातून कोणत्याही बाईच्या आत्म्याची लक्तरं निघतात. हे जरी मान्य केलं की प्रत्येक स्त्री ही सीता नाही तरी विचार करण्याची गोष्ट हीच आहे की सीता असण्याची वास्तविक काही गरज आहे का? विचारी होऊया आणि खऱ्या अर्थाने समानता राखूया, जेणेकरून काही राखीव ठेवायची गरजच उरणार नाही.
----धन्यवाद----
Nice.. अगदी खरं..
ReplyDelete